मूल : शहराच्या विविध भागांत झळकणा-या नियमबाहय बॅनर आणि होर्डिग्जकडे दुर्लक्ष करणारे नगर प्रशासन आज मात्र लाडक्या कुत्र्याच्या वाढदिवसा निमित्य लावलेल्या शुभेच्छा बॅनरची तातडीने दखल घेत काढुन टाकल्याने शहरात चर्चा रंगली आहे. सदर घटने नंतर नगर प्रशासनाच्या कारवाईतील सातत्य आणि समानतेवर नागरीकांमध्यें चर्चा रंगली असून नगर प्रशासनाच्या हतबलतेविषयी आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
शहराच्या विविध भागात जाहीरात आणि प्रसिध्दी म्हणून कित्येक वर्षापासून राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आदि विविध उपक्रम आणि कार्यक्रमाच्या बॅनर शिवाय वैयक्तीक वाढदिवसानिमित्य शुभेच्छा देणारे मोठया प्रमाणांत बॅनर आणि होर्डिग्ज लावल्या जाते. नगर परिषद हद्दीत कोणत्याही स्वरूपाचे बॅनर लावत असतांना नियमानुसार महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणुक काळात निवडणुक विभागाच्या निर्देशानुसार नगर प्रशासन सदर नियमांचे पालन करीत असते, एरव्ही मात्र शहराच्या विविध भागात मोठया प्रमाणांत होणाऱ्या बॅनरबाजी कडे नगर प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने उत आला आहे. नगर परिषद अधिनियमानुसार नगर परिषद हद्दीत बॅनर लावत असतांना परवानगी घेणे अनिवार्य असून नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून त्यासाठी निर्धारीत शुल्क भरणे आवश्यक आहे, बॅनर लावत असतांना त्यावर दिवसांच्या मुदतीशिवाय प्रकाशक, मुद्रक आणि आयोजकाचे नांव असणे गरजेचे असून हे बॅनर वाहतुकीला अडथळा होणार नाही अश्या ठिकाणी, चौक, वाहतुक सिग्नल, सरकारी इमारती आणि मालमत्ता, विद्युत खांब, झाड आदि ठिकाणी लावु नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. असे असतांना शहराच्या विविध भागात मागील कित्येक वर्षापासून नियमांचे उल्लंघन करून वेगवेगळया प्रकारचे बॅनर लावल्या जात असतांना त्यांचे विरूध्द कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा काढण्याची मोहीम न राबविता माणसापेक्षा निष्ठावंत आणि प्रामाणीक राहणा-या लाडक्या कुत्र्याच्या वाढदिवसा निमित्य लावण्यांत आलेल्या शुभेच्छा बॅनरची नगर प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. हे न उलगडणारे कोडे असून कुत्र्याच्या वाढदिवसा निमित्य लावण्यांत आलेल्या शुभेच्छा बॅनर वर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देणारे पदाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना शहराच्या विविध भागात नियमाचे उल्लंघन करून लावण्यात आलेले बॅनर दिसले कां नाही ? असा प्रश्न नागरीकांनी विचारला आहे. कुत्र्याच्या बॅनर वर कारवाई करायचीच होती तर इतर बॅनर वर नगर प्रशासनाने कां कारवाई केलेली नाही, असा सवाल केल्या जात आहे.
बॅनरवर झालेल्या कार्यवाही संबंधी शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांना विचारले असता त्यांनी शहरातील सार्वजनिक जागांचा वापर करताना नियमांचे पालन सर्वांकडून होणे अपेक्षीत आहे. मात्र कारवाई करताना भेदभाव आणि हतबलता दिसू नये, याची जबाबदारी प्रशासनाची आहे. अन्यथा प्रशासनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. असे मत व्यक्त केले. दरम्यान काढण्यांत आलेल्या बॅनर विषयी मुख्याधिकारी संदीप दोडे यांचेशी चर्चा केली असता त्यांनी शहरात लावण्यांत आलेले सर्व बॅनर आज काढण्यांत येणार असून त्याची सुरूवात कुत्र्याच्या वाढदिवसा निमित्य लावण्यात आलेल्या बॅनर पासून केल्याचे सांगीतले. यापुढील काळात बॅनर लावतांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यांत येणार असून नियमबाहय बॅनर लावण्यात आल्यास त्याविरूध्द नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगीतले. त्यामुळे पुढील काळात नियमबाह्य बॅनरविषयी नगर प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.









