मूल : चिचपल्ली वनपरिक्षेत्राच्या हद्दीत येत असलेल्या केळझर परिसरातील वेगवेगळ्या दोन वनजमीनीमध्यें मोठया प्रमाणांत अवैद्यरित्या मुरूमाचे उत्खनन झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बेकायदेशीर मुरूम उत्खननामूळे शासनाचे कोटयावधीचे नुकसान झाले असून मुरूम उत्खनन प्रकरणात उत्खननकर्त्या सोबतचं वनविभागाचे अधिकारीही सहभागी असल्याचे बोलल्या जात आहे.
केळझर येथील भैयाजी वाढई हयांना त्यांच्या मालकीच्या स.नं. 82 आणि 83 मधुन मुरूम उत्खनन करण्याची परवानगी तहसिलदार मूल हयांनी दिली. प्राप्त परवानगी नुसार स्वतःच्या शेतजमीनीमधुन मुरूमाचे उत्खनन करीत असतांना भैयाजी वाढई हयांनी संधी साधली. शेतजमीनीला लागुन असलेल्या वन विभागाच्या कक्ष क्रमांक 433 मधील गट क्रमांक 84 मधुन जेसीबी द्वारे मोठया प्रमाणांत मुरूमाचे उत्खनन करून परिसरात झालेल्या मार्गाच्या कामाकरीता पुरविण्यांत आल्याचे निदर्शनास आले. याबाबतची तक्रार होताच जागे झालेल्या वनविभागाच्या अधिका-यांनी चौकशी केली, भुमी अभिलेख विभागाच्या वतीने उत्खनन झालेल्या जागेची प्रत्यक्ष मोजणी केली असता उत्खननकर्त्याने स्वतःच्या शेतजमीनीपेक्षा वनविभागाच्या 70 टक्के जमीनीवर उत्खनन करतांना 4 मिटर खोल आणि 44 मिटर रूंद खोल खड्डा केल्याचे उजेडात आले. उत्खननकर्त्याने विना परवानगी वनविभागाच्या जागेवर उत्खनन करून लाखोचा महसुल बुडविल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने चिचपल्ली वनपरिक्षेत्राच्या अधिकारी स्वाती महेशकर हयांनी सदर प्रकरण पुढील तपासाकरीता वनविभागाचे प्राधिकृत अधिकारी यांचेकडे पाठविले असल्याचे समजते. अवैद्य मुरूम उत्खननाचे प्रकरण वर्षभरापुर्वीचे असून सदर प्रकरणात उत्खननकर्त्या सोबतचं वनविभाचे तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याचे बोलल्या जात असल्याने सदर प्रकरणाच्या चौकशीकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.
केळझर परिसरातील कक्ष क्रमांक 433 मधील स.नं. 84 मधील मुरूम उत्खनन प्रकरण उजेडात येताच त्याच परिसरातील मौजा चकसारजखेडा येथील वनविभागाच्या जागेमध्यें अवैद्यरित्या मुरूम उत्खनन झाल्याचे दुसरे प्रकरण समोर आले आहे. नारायण सोनुले हयांनी स्वतःच्या मालकीच्या स.नं. 125 मधील 2.64 आर. जागेमधुन मुरूम उत्खनन करण्याची परवानगी घेतली. परंतू त्यांनीही स्वतःच्या शेतजमीनीसोबतचं वनविभागाच्या मालकीच्या स.नं. 126 मधुन हजारो ब्राॅस मुरूम उत्खनन करून पर्यावरणाचे मोठया प्रमाणात नुकसान केले आहे.
केळझर परिसरात झालेल्या दोन ठिकाणच्या मुरूम उत्खननात भैयाजी वाढई आणि नारायण सोनुले हे दोन नांव समोर येत असले तरी सदर प्रकरणात केळझर येथील किशोर मुख्य सुत्रधार असल्याची चर्चा आहे
वर्षभरापुर्वी घडलेल्या मुरूम उत्खनन प्रकरणात वनविभागाचे तत्कालीन अधिकारी आणि कर्मचा-यांचा सहभाग असून त्यांच्याच आर्शिवादाने सदर प्रकरण दडपल्या जात होते. त्यामूळे सदर प्रकरणात वनाधिका-यांनी मोठया प्रमाणात आर्थिक लाभ घेतला असावा अशी शंका व्यक्त करत सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करून शासनाचे झालेले आर्थिक नुकसान वसूल करावे, अशी मागणी केळझर येथील चक्रधर मानकर आणि सुरज हजारे हयांनी केली आहे.











