मूल : अनधिकृत बॅनर आणि होर्डिग्ज कडे दुर्लक्ष करणा-या नगर प्रशासनाला कुत्र्याच्या वाढदिवसा निमित्य लावलेल्या शुभेच्छा बॅनरने जागे केले असून नगर प्रशासनाच्या परवानगी शिवाय शहरात बॅनर लावु नये. असे सक्त निर्देश मुख्याधिकारी यांनी दिल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जाहीरात आणि प्रसिध्दी म्हणून शहराच्या विविध भागात मोठया प्रमाणांत बॅनर आणि होर्डिग्ज लावल्या जाते. नगर परिषद हद्दीत कोणत्याही स्वरूपाचे बॅनर लावतांना नियमानुसार महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार परवानगी घेणे आवश्यक आहे. असे असतांना शहराच्या विविध भागात अनधिकृत बॅनरबाजीला उत आला होता. नगर परिषद अधिनियमानुसार नगर परिषद हद्दीत बॅनर लावतांना निर्धारीत शुल्क भरणे आवश्यक असुन त्यावर दिवसांचा कालावधी, प्रकाशक, मुद्रक आणि आयोजकाचे नांव असणे गरजेचे आहे, शिवाय वाहतुकीला अडथळा होणार नाही अश्या चौक, वाहतुक सिग्नल, सरकारी इमारती आणि मालमत्ता, विद्युत खांब आदि ठिकाणी लावु नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. असे असतांना मागील कित्येक वर्षापासून नियमांचे उल्लंघन करून शहरात बॅनर लावल्या जात होते. त्यामुळे नियमानुसार अनधिकृत बॅनर लावणा-यांविरूध्द कार्यवाही होणे अपेक्षीत होते. परंतु अशी कोणतीही कार्यवाही केल्या जात नसल्याने एका व्यक्तीने कुत्र्याच्या वाढदिवसा निमित्य शुभेच्छा देणारे बॅनर शहराच्या काही भागात लावले. सदर बॅनर लागताच खळबळुन जागे झालेल्या नगर प्रशासनाने लावलेले कुत्र्याचे शुभेच्छा बॅनर काढुन टाकले. त्यामुळे कुत्र्याच्या वाढदिवसाचे बॅनर लावणा-या व्यक्तीने मुख्याधिकारी यांना विचारले तेव्हा त्यांनी शहरात लावलेले सर्व बॅनर काढणार असुन यापुढील काळात बॅनर लावतांना नगर परिषद अधिनियमाचे पालन करण्यांत येणार असल्याचे सांगीतले. दरम्यान नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत काही सदस्यांनी बॅनरचा मुद्दा उपस्थित केला तेव्हाही मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी यापुढील काळात शहरात परवानगी विना बॅनर लावण्यात आल्यास नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन दिल्याचे समजते. त्यामुळे पुढील काळात शहरात झळकणा-या बॅनर विरूध्द नगर प्रशासन कोणती भूमिका घेते. याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.










