मूल : पाणी पुरवठा योजना ही अत्यावश्यक सेवा असल्याने विज वितरण कंपनीने याकरीता एक्सप्रेस फिडर उपलब्ध करून दिला आहे. असे असतांना विज वितरण कंपनी नगर प्रशासनाला बदनाम व जनतेला ञास देण्याच्या उद्देशाने विज पुरवठा खंडीत करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष सौ. एकता प्रशांत समर्थ यांनी केला आहे.
नगर परीषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पञकार परीषदेत बोलतांना नगराध्यक्ष सौ. एकता समर्थ यांनी काही मंडळी हेतुपुरस्सररित्या ञास देत असले तरी पाच वर्षाच्या कार्यकाळात निवडणुकपुर्व दिलेल्या वचननाम्यातील आश्वासनांची पुर्तता करणार असल्याची ग्वाही दिली. सलग पंधरा वर्षे सत्ता गाजविणा-या भाजपाला पार पडलेल्या निवडणुकीत नगर परीषदेची सत्ता गमवावी लागल्याने पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. म्हणुन त्यांनी या-ना-त्या मार्गाने ञास देण्याचा प्रकार चालविला असल्याचे सांगतांना नगराध्यक्षा एकता समर्थ यांनी आम्ही पदारूढ होण्यापूर्वी नगर परीषदेकडे ६५ लाख रूपयाचे विज देयक थकीत होते. आम्ही पदभार सांभाळताच थकीत देयकापैकी ४० लाख रुपयाचा भरणा केला. त्यानंतरही जानेवारी महीण्यात दोनदा आणि फेब्रुवारी महीण्यात तीनदा असे पाच वेळा विद्युत पुरवठा खंडित केला. याविषयी विचारले असता थकीत विज देयकाचा त्वरीत भरणा करा. अन्यथा विज पुरवठा पुन्हा खंडीत करण्यात येईल. अशी तोंडी धमकी पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्याला देण्यात आली. हा प्रकार अयोग्य असुन विज वितरण कंपनी कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत असावी. अशी शंका व्यक्त केली.
मिळालेल्या माहीतीनुसार जिल्ह्यातील काही नगर पंचायती कडे कोट्यावधीचे विज देयक थकीत आहेत. विज देयक थकीत असलेल्या नगर पंचायतीचा विज पुरवठा आजपर्यंत खंडीत केला नाही. मग मूल नगर परिषदेचा पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा कां खंडीत करण्यात येते. असा प्रश्न नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी विज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना विचारला आहे. शहर वासीयांना पाण्याची समस्या जाणवु नये म्हणुन शहरात ४२ सार्वजनीक विहिरी, ३०० बोअरवेल ६४१ खाजगी विहिरी, टँकर उपलब्ध असुन बंद असलेल्या बोअरवेल दुरूस्तीचे प्रयोजन करण्यात आल्याचे सांगतांना नगराध्यक्षा एकता समर्थ यांनी शहराचा विकास आणि जनतेची सेवा करण्यासाठी सत्तारूढ काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक तत्पर असुन योग्य पाठपुरावा करून नगरातील रस्ते, नाल्या, स्वच्छता, आरोग्य, मोकाट जनावरे आदी समस्या सोडविल्या जाणार आहे. जनतेनी अपप्रचाराला बळी न पडता संयम ठेवुन सहकार्य करावे अशी विनंती केली, यावेळी उपाध्यक्ष राकेश रत्नावार, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, पाणी पुरवठा सभापती विलास कागदेलवार, शिक्षण सभापती लीना फुलझेले, महीला व बाल कल्याण उपसभापती समीक्षा कडसकर, नगर सेवक ज्योती चटारे, विवेक मुत्यलवार, राहुल प्रेमलवार, काजल धारणे, गुलाब पठाण, अशोक येरमे, सुशीला खोब्रागडे, उज्वला कामडी यांचेसह नगर परीषदेचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नगर परीषदेच्या सत्तेपासुन दुर राहीलेली काही मंडळी राजकीय द्वेषापोटी विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्तारूढ काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांना बदनाम करतांना जनतेला विनाकारण वेठीस धरत आहेत
राकेश रत्नावार,
उपाध्यक्ष, नगर परीषद मूल
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समीती मूल










