राकेश रत्नावार मूल नगर परिषदेचे पाचव्यांदा उपाध्यक्ष, गुलाबखाॅ पठाण आणि बंडू गुरनुले यांची नामनिर्देशित सदस्य पदी निवड

0
27

मूल : काॅंग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केलेल्या वीस सदस्यीय मूल नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी काॅंग्रेसचे गटनेते राकेश रत्नावार यांची तर गुलाबखाॅ दिलदारखाॅ पठाण आणि बंडु शशीकांत गुरनूले यांची नामनिर्देशित सदस्य पदावर आज बिनविरोध निवड झाली.
नगर परिषदेचे उपाध्यक्ष आणि दोन नामनिर्देशित सदस्य निवडी करीता नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ यांच्या अध्यक्षतेखाली आज नगर परिषद सभागृहात सभा पार पडली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अजय चरडे आणि मुख्याधिकारी संदीप दोडे उपस्थित होते. अलीकडेच झालेल्या मूल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शनात आणि कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काॅंग्रेसने वीस पैकी अठरा जागांवर विजय मिळवत नगर परिषदेवर एक हाती सत्ता मिळवली. भाजपाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. निवड करावयाच्या दोन नामनिर्देशित सदस्यांच्या निवडणुकी करीता गटनेते राकेश रत्नावार यांनी मस्जीद इदगाह कमेटीचे उपाध्यक्ष तथा युवाशक्ती क्रिडा मंडळाचे कोषाध्यक्ष गुलाबखाॅ दिलदारखाॅ पठाण आणि आनंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय बेंबाळ येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि ग्रामीण विकास प्रसारक मंडळाचे सचिव बंडु शशीकांत गुरनूले यांचे नांव प्रस्तावित केले होते. गुलाबखाॅ पठाण आणि बंडु गुरनूले यांचे नांवाशिवाय दुसरे कोणतेही नांव समोर न आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी अजय चरडे यांनी नामनिर्देशित सदस्य म्हणून गुलाबखाॅ पठाण आणि बंडु गुरनूले यांच्या नांवाची घोषणा केली. गुलाबखाॅ पठाण आणि बंडु गुरनूले यांच्या निवडीमूळे नगर परिषदेत काॅंग्रेसचे संख्याबाळ आता वीस झाले आहे. आज शांततेत पार पडलेल्या नगर परिषदेच्या पहिल्या सभेला भाजपाच्या दोन सदस्यांसह काॅंग्रेसचे अठराही सदस्य उपस्थित होते.

कित्येक वर्षानंतर मूल नगर परिषदे मध्यें मुस्लीम धर्मिय व्यक्तीला काॅंग्रेसने प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्याने मुस्लीम धर्मीयांनी काॅंग्रेस नेतृत्वाप्रती आभार व्यक्त केले आहे

वयाच्या 22 व्या वर्षीपासून राजकिय क्षेत्रात पदार्पण करणारे राकेश रत्नावार पाचव्यांदा नगर परिषदेचे उपाध्यक्ष झाले आहेत. यापूर्वीही त्यांनी नगर परिषदेच्या विविध समित्यांचे सभापती म्हणून उल्लेखनीय कार्ये केले असून दांडगा जनसंपर्क असलेले राकेश रत्नावार सध्यास्थितीत मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणूनही कार्यरत आहेत

दोन नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीविषयी काही माध्यमांनी काॅंग्रेस अंतर्गत असंतोष पसरविण्याचा खटाटोप केला परंतू संतोषसिंह रावत यांच्या कुशल व संघटन कौशल्यामूळे त्यांचा खटाटोपाचा बार फुसका निघाला. हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here