मूल नगर परीषदेवर काँग्रेसचे वर्चस्व, नगराध्यक्षा सह अठरा जागेवर मिळविला विजय, भाजपाला मानावे लागले दोन जागेवर समाधान

0
25

मूल : विस सदस्यीय मूल नगर परीषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने २० पैकी १८ जागा जिंकुन सत्ता प्रस्थापित केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या एकता प्रशांत समर्थ ह्यांनी भाजपाच्या प्रा. किरण किशोर कापगते ह्यांचा २०८१ मताने पराभव केला आहे. भाजपाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण झाला आहे.
माजी मंञी तथा भाजपाचे दिग्गज नेते आ. सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या विधानसभा क्षेत्रातील मूल नगर परीषदेवर मागील बारा वर्षापासुन भाजपाची सत्ता होती. आ. सुधीर मुनगंटीवार ह्यांनी केलेल्या विकास कामांच्या बळावर झालेल्या निवडणुकीत भाजपा पुन्हा विजयी होईल. असे बोलल्या जात होते. तसा विश्वासही भाजपा नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांना होता. परंतु या विश्वासाला काँग्रेसच्या एकजुटीने तडा पोहोचविला आहे. माजी मंञी तथा काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार, खा. प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि माजी आमदार देवराव भांडेकर यांचे मार्गदर्शनात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जि.प.चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काँग्रेसने कंबर कसुन निवडणुक लढविली. भाजपा पासुन फारकत घेवुन काँग्रेसवासी झालेले नगर परीषदेचे माजी सभापती प्रशांत समर्थ ह्यांच्या सहचारीणी एकता समर्थ ह्यांना काँग्रेसने नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरविले. भाजपाच्या प्रा. किरण कापगते ह्यांचे शिवाय शिवसेना शिंदे गटाच्या भारती राखडे, वंबआ-बसपा युतीच्या चैताली मद्रीवार आणि अपक्ष गितांजली तांगडे ह्यांचेशी त्यांनी लढत दिली. काँग्रेसच्या एकता समर्थ ह्यांना ७९५४ मते मिळाली तर भाजपाच्या प्रा. किरण कापगते ह्यांना ५८७३ मते मिळाली. एकता समर्थ ह्यांनी भाजपाच्या किरण कापगते ह्यांचा २०८१ मतांनी पराभव करत नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या भारती राखडे ह्यांना २२०, बसपाच्या चैताली मद्रीवार-५१२ आणि अपक्ष गितांजली तांगडे ह्यांना ११८ मतांवर समाधान मानावे लागले. दहा प्रभागा मधुन निवडुन द्यावयाच्या २० नगर सेवक पदाच्या निवडणुकीत प्रभाग १ मधुन काँग्रेसचे प्रशांत समर्थ (९७३) ह्यांनी भाजपाचे अजय गोगुलवार (४७५) ह्यांचा पराभव केला. काँग्रेसच्या काजल धारणे (८६१) यांनी भाजपाच्या संजना मडावी (५०४) ह्यांचा पराभव केला. प्रभाग २ मधुन भाजपाच्या अश्वीनी निकोडे (७७८) यांनी काँग्रेसच्या पायल महाडोरे (७४३) मताने पराभव केला तर काँग्रेसचे तुकाराम गुरनुले (६१६) यांनी भाजपाचे सुरज मांदाडे (५९५) ह्यांचा पराभव केला. प्रभाग ३ मधुन काँग्रेसच्या शालु शेरकी (६६५) यांनी भाजपाचे आचल चौखुंडे (५००) यांचा पराभव केला. काँग्रेसचे मिथुन गद्देवार (९६०) यांनी भाजपाचे प्रशांत बोबाटे (४१७) यांचा पराभव केला. प्रभाग ४ मधुन काँग्रेसचे राकेश रत्नावार (७९०) यांनी भाजपाचे अनिल साखरकर (२८०) यांचा तर काँग्रेसच्या उज्वला कामडी (६६३) यांनी भाजपाच्या लिना बद्देलवार (३९२) यांचा पराभव केला. प्रभाग ५ मधुन भाजपाच्या प्राची आक्केवार (७३३) यांनी काँग्रेसच्या भारती मेश्राम (६९७) यांचा तर काँग्रेसचे रितीक गोयल (८०७) यांनी भाजपाचे जितेंद्र टिंगुसले (५६२) यांचा पराभव केला. प्रभाग ६ मधुन काँग्रेसचे विवेक मुत्यलवार (८२५) यांनी भाजपाचे नंदकिशोर रणदिवे (४०२) मताने तर काँग्रेसच्या नलीनी आडपवार (७९६) यांनी भाजपाच्या आशा गुप्ता (३९२) यांचा पराभव केला. प्रभाग ७ मधुन काँग्रेसचे अशोक येरमे (७२६) यांनी भाजपाचे झंकास कुमरे (५८३) यांचा तर काँग्रेसच्या समीक्षा कडस्कर (७५२) यांनी भाजपाच्या माधुरी करकाडे (५९२) यांचा पराभव केला. प्रभाग ८ मधुन काँग्रेसच्या ज्योती चटारे (९३७) यांनी भाजपाच्या अपर्णा भेंडारे (४८३) यांचा तर काँग्रेसचे अतुल गोवर्धन (६६६) यांनी भाजपाचे मिलींद खोब्रागडे (६४०) मताने पराभव केला. प्रभाग ९ मधुन काँग्रेसचे विलास कागदेलवार (४७५) यांनी भाजपाचे प्रशांत लाडवे (३८७) यांचा तर काँग्रेसच्या ललिता फुलझेले (५९३) यांनी भाजपाच्या पुजा रामटेके (३७५) यांचा पराभव केला तर प्रभाग १० मध्ये काँग्रेसच्या सुशीला खोब्रागडे (८६७) यांनी भाजपाच्या बिंदु जुमडे (५१९) यांचा तर काँग्रेसचे राहुल प्रेमलवार (८५४) यांनी भाजपाचे निलेश राय (रायकंठीवार) यांचा २०३ मताने दणदणीत पराभव केला.
निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी दुर्गा मंदीर येथे जावुन देवीचे दर्शन घेतले. यावेळी श्री माँ दुर्गा मंदीर येथुन गांधी चौक युवा नेतृत्व रूपलसिंह रावत यांचे नेतृत्वात विजयी मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीची सांगता स्थानिक गांधी चौकात विजयी सभेने झाली. यावेळी माजी मंञी विजय वडेट्टीवार यांचे उपस्थितीत नगराध्यक्ष एकता समर्थ यांचेसह विजयी १८ उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आ. विजय वडेट्टीवार यांचेसह काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत आणि माजी आमदार देवराव भांडेकर आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी मनोगत व्यक्त करत जनतेचे आभार मानले. यावेळी प्रशांत समर्थ आणि राकेश रत्नावार यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शहरातील जनता हजारोच्या संख्येने उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here