Home Breaking News भाजपाच्या तिकीट वाटपावरून तेली समाजात तीव्र नाराजी : “दिलेला शब्द ठेवला नाही,...

भाजपाच्या तिकीट वाटपावरून तेली समाजात तीव्र नाराजी : “दिलेला शब्द ठेवला नाही, पात्र इच्छुकांवर अन्याय” — मूलमध्ये राजकारण तापले

0
62

मूल  :  रमेश माहूरपवार : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच मूल शहरात राजकीय हालचाली वेगाने वाढू लागल्या. प्रभागांतील उमेदवारी निश्चित करण्यासाठी भाजपाने इच्छुकांकडून अर्ज मागवले, सर्वेक्षणे केली आणि पक्षांतर्गत चर्चाही रंगल्या. मात्र अंतिम यादी जाहीर होताच अनेकांना धक्का बसला. विशेषतः इंजी. शिवानी संदीप आगडे यांची उमेदवारी अचानक कापली गेल्याने तेली समाजासह अनेक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

शब्द दिला… पण पूर्ण झाला नाही ?

पक्षातील वरिष्ठ नेते, तसेच स्थानिक आमदारांनी स्वतः “उमेदवारी तुमची निश्चित” असा शब्द दिल्याची चर्चा शहरभर पसरली होती. शिवानी आगडे सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर असल्याचेही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये खुलेपणाने बोलले जात होते; याबाबत पक्षाच्या अंतर्गत दस्तावेजांचीही हळूवार कुजबुज होती. त्या सर्वच गणितांवर शिक्कामोर्तब करत दोन दिवस आधी “तिकीट कन्फर्म” झाल्याच्या चर्चेनंतर आगडे यांनी प्रचाराची तयारी सुरू केली. पोस्टर्स, बॅनर्स, सोशल मीडिया प्रमोशन—सर्वकाही जोरात सुरू होते.
मात्र अखेरच्या क्षणी परिस्थिती पलटली.
सर्वेक्षणात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रा. किरण कापगते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

यामुळे शिवानी आगडे समर्थकांनी एकच सवाल उपस्थित केला—
➡️“पक्षश्रेष्ठीवर कोणाचा दबाव होता?”
➡️ “दिलेला शब्द तडा कसा गेला?”
➡️ “नेमका निर्णय सर्वेवर झाला की दबावावर?”

तेली समाजाची नाराजी शिगेला

तेली समाजाच्या अनेक बैठका तातडीने बोलावण्यात आल्या. नेत्यांनी एकमुखाने मत मांडले की,
“सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली नाही तर मग सर्वे का?”

काही कार्यकर्त्यांनी तर थेट असा आरोप लावला—
➡️ “आमदारांच्या राजकीय खेळात पात्र इच्छुकांवर अन्याय झाला.”

प्रभाग ५ मधून नगरसेवक पदाचे गाजर पुढे करून शिवानी आगडेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांनी त्वरित नकार देऊन स्पष्ट सांगितले—
“असमानतेच्या निर्णयाला मान्यता नाही.”

भाजपात बंडखोरीचे संकेत

या संपूर्ण घडामोडीनंतर भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढल्याचे चित्र आहे. काही कार्यकर्ते “दिलेला शब्द – केला पूर्ण दुसऱ्यालाच!” असा उपरोधिक टोमणा मारताना दिसत आहेत.

आगडे समर्थकांचा संताप असा की,
➡️ “पात्र इच्छुकाला बाजूला सारून दबावाखाली उमेदवारी दिली गेली.”
➡️ “समाजाच्या पाठिंब्याची किंमत मोजावी लागली.”

त्यामुळे मूल नगरपरिषद निवडणुकीत भाजपात बंडखोरीचे पडसाद उमटण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

गांभीर्य वाढवणारे प्रश्न

या संपूर्ण प्रकरणामुळे पुढील गंभीर प्रश्न उभे राहतात—

पक्षीय सर्वेक्षणाची किंमत किती?

आमदारांचे आश्वासन म्हणजे फक्त निवडणूकपूर्व राजकीय खेळ?

शेवटच्या क्षणी घेतलेले निर्णय कार्यकर्त्यांच्या मनोबलावर किती परिणाम करतात?

*राजकारणात दिलेला शब्द किती टिकाऊ?*

या संपूर्ण प्रकरणातून मूल शहरात एकच चर्चा पुन्हा डोकं वर काढताना दिसते—
“शब्द देणे आणि ते पूर्ण करणे … राजकारणात हे दोन्ही वेगवेगळे असतात!”

तेली समाजाची नाराजी, कार्यकर्त्यांचा रोष आणि आमदारांबाबत वाढलेली अविश्वसनीयता—या तिन्ही घटकांनी मूलमधील भाजपाचे वातावरण ढवळून काढले आहे. आगामी निवडणुकीत याचा काय परिणाम होईल हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.