मूल : पोलिस आणि पत्रकार असल्याचे सांगुन खंडणी वसूल करणा-या तोतया पोलिस आणि पत्रकाराच्या टोळीस मूल पोलीसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या चार जणांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. बादल दुर्गाप्रसाद दुबे, वय 36 ,रा.भिवापूर चंद्रपूर, संगीता बादल दुबे, वय 27, रा.भिवापूर चंद्रपूर, अजय विजय उईके वय 31, रा.चंद्रपूर, देवेंद्र चरणदास सोनवणे रा.चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी संगनमत करून ३ जुलै रोजी मौजा चिरोली येथील सुरेश लक्ष्मण गणवेनवार यांच्या घरी जावून भरारी पथकातील पोलिस असल्याचे सांगुन विनापरवाना दारू विक्री करीत असल्याचा धाक दाखवुन कारवाई करण्याची धमकी दिली. कारवाई टाळायची असेल तर १५ हजार द्यावे लागतील. असे सांगुन पैश्याची मागणी केली. पोलीस कारवाई करून अटक करतील या भितीने सुरेश गणवेनवार यांनी तडजोड करून १० हजार रूपये खंडणी वसूल केली. तसेच मौजा डोंगरगाव येथील एजाज शेख ईब्राइम शेख यांच्या अंडा आमालेट टपरीवर जावून दारू पिणारे व्यक्ती आढळून आल्याचा धाक दाखवून ५ हजार रूपयांची खंडणी वसूल केली. चिरोली येथील सुरेश गणवेनवार यांच्या लेखी तक्रारीवरून तोतया पोलिस आणि पत्रकारांच्या टोळीवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यासाठी सापळा रचुन खंडणी मागणा-या आरोपींना अटक केली. त्यांचे कडून पांढ-या रंगाचे चार चाकी वाहन अंदाजे किंमत 12 लाख 50 हजार रूपये, दोन स्मार्ट मोबाईल किंमत 45 हजार रूपये आणि नगदी 15 हजार रूप्ये असा एकूण 13 लाख 10 हजार रूपयांचा मुददेमाल पोलीसांनी हस्तगत केला. मूल पोलिसांच्या तत्परतेने आरोपींना अटक करण्यात आली. पोलिस निरिक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक सुबोध वंजारी,पोलिस हवालदार भोजराज मुंडरे, जमीरखान पठाण, चिमाजी देवकते,नरेश कोडापे, शंकर बोरसरे,संदिप चुधरी यांनी ही कारवाई केली. कलम ३०८ (२) २०४,३(५) बिएनएस अन्लये गुन्हा दाखल करून पुढील तपास मूल पोलिस करीत आहे.












