मूल : शासकीय नोकरी लावुन देण्याचे आश्वासन देवुन युवकांना लाखोने गंडविणा-या दोन महाभागापैकी राजु पुद्दटवार यांनी पोलीसांसमोर शरणागती स्विकारल्याने अनेक प्रकरणांचा उलगडा होईल. अशी चर्चा आहे. पहील्या आरोपीच्या अटकेनंतर दुसरा आरोपी नाना आक्केवार लवकरच पोलीसांच्या गळाला लागेल. असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे.
- येथील नगर परीषदेत लिपीक पदावर सेवारत असलेले राजु उर्फ राजेश पुद्दटवार आणि तालुका क्रिडा कार्यालयात रोजंदारीवर काम करणारा प्रशांत उर्फ नाना आक्केवार यांनी संगनमताने दोन युवकांना शासकीय सेवेत नोकरी लावुन देतो, असे आमीष दाखवुन १६ लाख ५० हजाराने गंडा घातला. दरम्यान राजु पुद्दटवार आणि नाना आक्केवार यांनी आपली फसवणुक केली. असे जेव्हा लक्षात आले तेव्हा दोन्ही युवकांनी पोलीस स्टेशन मूल येथे तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार राजेश उर्फ राजु पुद्दटवार आणि प्रशांत उर्फ नाना आक्केवार यांचे विरूध्द पोलीस स्टेशन मूल येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्याचे लक्षात येताच अटकेच्या भितीने राजु पुद्दटवार आणि नाना आक्केवार हे शहरातुन बेपत्ता झाले. पोलीस प्रशासन बेपत्ता दोन्ही महाभागांच्या शोधात असताना राजेश उर्फ राजु पुद्दटवार यांनी पोलीस स्टेशन मूल येथे स्वतः हजर राहुन अटक करून घेतली. दुसरा महाभाग नाना उर्फ प्रशांत आक्केवार अजुनही बेपत्ता असुन पोलीसांचे वेगवेगळे पथक त्याचा शोध घेत आहेत. त्यामूळे नाना आक्केवार लवकरच पोलीसांच्या गळाला लागेल. असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे.
कोरपना तालुक्यातील साईश्वर पुलगमवार आणि मूल येथील राहुल महाजनवार यांच्या तक्रारीनंतर तालुका क्रिडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी प्रशांत उर्फ नाना आक्केवार यांचे विरूध्द तिसरी तक्रार दाखल केली आहे. ज्यांच्या हाताखाली नाना आक्केवार तालुका क्रिडा कार्यालयात शिपाई पदावर रोजंदारीवर कामावर होता त्या तालुका क्रिडा अधिका-यासही नाना आक्केवार यांनी मुलाला नोकरी लावुन देतो असे सांगुन २८ लाख २६ हजार रूपयाने चुना लावला आहे. त्यामूळे ऐकावे ते नवलचं अशी शहरात चर्चा आहे.












