मूल – मूल-चंद्रपूर रेल्वे मार्गावर मूल स्टेशन पासून एक किलोमीटर अंतरावर नर चितळाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबतची माहिती पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी वन कर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांना दिली. माहिती मिळताच संजीवन संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे, वन विभगाचे क्षेत्र सहाय्यक मस्के, प्रशांत मुत्यारपवार, वनमजूर विशाल टेकाम, आशीष बोरकर हे घटनास्थळी जाऊन चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कु.प्रियंका वेलमे यांचे मार्गदर्शनात घटनेचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी संदिप छौंकर यांनी चितळाचे शवविच्छेदन केले व नंतर त्याचे दहन करण्यात आले. वन्य प्राण्यांचे अशाच प्रकारे अपघात होत असल्याने वनातील प्राणी कमी होत असून जंगलातील त्याची शिकार मिळत नसल्याने वाघ गाव आणि शेतीकडे येत असल्याने मानवावर वाघाचे हल्ले होणाचे घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन मंत्रालयाने वनाला संरक्षण ताराची जाळी लावावी अशी मागणी ग्रामस्थांकडून व शेतकरी बांधवांनी केली आहे. असे केले तर भविष्यात मानव व वन्यप्राणी सुरक्षित राहतील.












