मूल (प्रतिनिधी) कायदा व सुव्यवस्थेशिवाय गुन्हेगारी प्रवृृत्तीवर आळा बसावा प्रसंगी त्याचा शोध घेण्यास पोलीस प्रशासनाला मदत व्हावी म्हणुन शहराच्या विविध ठिकाणी बसविण्यात आलेले अनेक सीसीटिव्ही कॅमेरे बंद असल्याने प्रशासनाच्या कारभाराविषयी आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. शहरात घडणा-या चो-या, अपघात किंवा अन्य गैरकृत्यावर पोलीस प्रशासनाला नियंत्रण ठेवता यावे किंवा एखादे गंभीर व जीवघेणे कृत्य घडल्यास सदर कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यास पोलीस प्रशासनाला मदत व्हावी म्हणून शहराच्या रहदारीच्या मुख्य मार्गासोबतचं महत्वाच्या १५ ते २० ठिकाणी लाखो रूपये खर्चुन सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यांत आले. शहराच्या विविध भागात लावण्यांत आलेल्या सिसिटिव्ही कॅमेत्याचे थेट चित्रण (फुटेज) पाहण्याची व रेकार्डीगची व्यवस्था पोलीस स्टेशन येथे करण्यांत आली आहे. त्यामूळे शहरात एखादी अनुसूचित घटना, चोरी किंवा अपघात घडल्यास त्याचा शोध घेण्यास पोलीस प्रशासनाला मौलाचे सहकार्य मिळत असते. परंतू शहराच्या मुख्य ठिकाणी लावण्यांत आलेल्या १५ ते २० सीसीटिव्ही कॅमे-यांपैकी केवळ ७ ते ८ कॅमेरे सध्यास्थितीत सुरू असून उर्वरीत सर्व कॅमेरे मागील कित्येक महिण्यांपासून बंद आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी बंद असलेले सर्व कॅमेरे सुस्थितीत करून मिळावे म्हणून मागील कित्येक महिण्यांपासून पोलीस प्रशासन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत आहे. परंतू जनतेच्या जीवीत आणि मालमत्तेशिवाय कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे कामी पोलीस प्रशासनाला महत्वाचे सहकार्य करणारे अर्ध्यापेक्षा जास्त सिसिटिव्ही कॅमेरे बंदावस्थेत असल्याने भविष्यात एखादया घटनेचा शोध घेण्यास पोलीस प्रशासनाला त्रासदायक ठरणार आहे. त्यामूळे विधायक उद्देशाने बसविण्यात आलेले शहरातील सर्वच सिसिटिव्ही कॅमेरे संबंधित विभागाने सुस्थितीत करून दयावे. अशी मागणी पोलीस प्रशासना सोबतचं अनेक नागरीक करीत आहेत.












