मूल (प्रतिनिधी)
रस्त्याची दिशा लक्षात न घेता बांधकाम करण्यांत आल्याने लाखो रूपये खर्चाचे आसोलामेंढा नहरावरील दोन पूल शोभेचे ठरले आहे. दरम्यान जनतेच्या सोयीसाठी बांधलेले ते पुल केव्हा उपयोगी पडणार ? असा प्रश्न काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
जनतेची मागणी आणि अडचण लक्षात घेवून जनतेच्या सोयीसाठी २०१४ मध्यें शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने तालुक्यातील गडीसुर्ला आणि चक दुगाळा गांवाजवळून गेलेल्या आसोलामेंढा नहरावर लाखो रूपये खर्चून पुलाचे बांधकाम केले. दोन्ही पुलाचे बांधकाम पुर्णत्वात आले असले तरी हे दोन्ही पुल तांत्रीक अडचणीमूळे आजही शोभेचे ठरत आहे. नहराद्वारे शेतीला पाणी पुरवठा करतांना नागरीकांना रस्त्याने ये-जा करणे सोईचे व्हावे म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने गडीसुर्ला आणि चकदुगाळा ते बेंबाळ ग्रामीण मार्गावर अश्या दोन ठिकाणी पुलाचे बांधकाम केले. ज्या ठिकाणी पुल बांधकाम करण्यांत आले त्या ठिकाणाहून सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिनस्त असलेला ग्रामीण मार्ग समोर जातो. सध्यास्थितीत या दोन्ही ग्रामीण मार्गामधून जाणा-या आसोलामेंढा नहरावर पुल असून हे दोन्ही पुल अनेक वर्षापूर्वी बांधले असल्याने कमी उंचीचे व अरूंद आहेत. नहराचे पाणी सोडल्यानंतर या कमी उंचीच्या दोन्ही पुलावर धोका होण्याची शक्यता लक्षात घेवून २०१४ मध्यें पाटबंधारे विभागाने पुल बांधकाम हाती घेतले. परंतु रस्त्याची दिशा आणि वास्तविक भौगोलीक स्थिती लक्षात न घेता दोन्ही ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यांत आल्याने हे दोन्ही पुल योग्य मोजमाप आणि अलाईमेंट अभावी वाहतुकीसाठी अयोग्य झाले आहे. त्यामूळे मागील कित्येक वर्षापासून जुन्याच पुलावरून हलक्या वाहणांसह नागरीकांची ये-जा सुरू आहे. पुल बांधकाम करतांना पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन तज्ञ अभियत्यांनी रस्त्याची दिशा लक्षात घेतली असती तर अलाईनमेंटची समस्या आज उद्भवली नसती. परंतू दोन्ही पुलाचे अलाईनमेंट बरोबर नसल्याने लाखो रूपये किंम्मतीचे हे दोन्ही पूल मागील काही वर्षापासून शोभेचे ठरत आहे. दरम्यान नहरावर बांधकाम करण्यांत आलेले दोन्ही पुल तत्कालीन अधिका-यांच्या चुकीच्या नियोजनामूळे आज बिनकामाचे ठरले आहे. नागरीकांना आजही जुन्याच पुलावरून ये जा करावे लागते. बांधकामा करीता नागरीकांच्या हक्काचे लाखो रूपये खर्चून आज त्याचा योग्य वापर होत नाही, ही शोकांतीका आहे. या दोन्ही मार्गाचा तिढा संबंधीत विभागाने लवकरात लवकर सोडवावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मूल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर,शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अखील गांगरेड्डीवार, संजय गांधी निराधार योजनेचे माजजी अध्यक्ष राकेश रत्नावार, बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप कारमवार, संचालक राजेंद्र कन्नमवार, किशोर घडसे, शांताराम कामडी यांनी दिला आहे.












