मूल नगर परीषदेच्या प्रारूप मतदार यादीत घोळच घोळ, चुका दुरूस्त केल्याशिवाय निवडणुक न घेण्याची काँग्रेसची मागणी, दिला रस्त्यावर उतरण्याचा खणखणीत इशारा

0
13

मूल : नगर परीषद निवडणुकीच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने तयार केलेल्या मतदारांच्या प्रारूप यादीत मोठ्या प्रमाणात चुका झाल्या असुन प्रशासनाने त्या चुकांची दुरूस्ती करूनचं अंतीम मतदार यादी तयार करावी. अन्यथा लोकशाहीच्या हितासाठी आंदोलन करू. असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातुन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले आणि शहराध्यक्ष सुनिल शेरकी यांनी नुकतीच स्थानिक विश्राम गृह मूल येथे पञकार परीषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलतांना मूल शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी २०२४ मध्ये झालेल्या बल्लारपुर विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीत तब्बल १६०० मतदारांचे नांव दोनदा तर काहींचे तिनदा आले असुन त्यांचे ईपीक क्रमांकही वेगवेगळे दर्शविण्यात आल्याचे पुरावे सादर केले. यापैकी १२२ जणांचे नांव मूल शहराच्या मतदार यादीत असल्याचे सांगतांना सुनिल शेरकी यांनी निवडणुक आयोगाच्या दृष्टीकोनातुन १ जुलै २०२५ रोजी अद्यावत असलेल्या मतदार यादीत त्यापुर्वी मृत्यु पावलेल्या शेकडो व्यक्तींचे नांव कोणत्या आधारावर मतदार म्हणुन कायम ठेवण्यात आले ? असा प्रश्न करत आश्चर्य व्यक्त केले. निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन प्रभागाचे सिमांकन करतांना प्रशासनाने इतर नियमांसोबतचं किमान भौगोलिक परिस्थिती आणि मतदारांची संख्या लक्षात घेणे गरजेची होती. परंतु प्रशासनाने असे काहीही न करता केवळ नियम डोळ्यासमोर ठेवुन कार्यालयात बसुन प्रभागाचे सिंमाकन केले त्यामूळे अनेक प्रभागाच्या मतदार संख्येत शेकडोची तफावत असल्याचे निदर्शनास येते. असाही आरोप शेरकी यांनी केला. तालुकाध्यक्ष गुरूदास गुरनुले यांनी निवडणुक आयोगाच्या कार्यपध्दतीवर शंका व्यक्त करतांना देशातील काही स्वायत्त संस्था सत्तारूढ पक्षाच्या दबावाखाली काम करीत असल्याने भविष्यात लोकशाहीला धोका होण्याची शक्यता व्यक्त केली. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान आणि मतांची चोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. त्यामूळे पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीत झालेल्या चुका दुरूस्त करण्यासाठी निवडणुक आयोगाने प्रयत्न करणे अपेक्षित होते व आहे. परंतु होवु घातलेल्या नगर परीषद निवडणुकीच्या दृष्टीकोनातुन तयार करण्यात आलेल्या मतदारांच्या प्रारूप यादीत अनेक मतदारांचे नांव बदललेल्या ईपीक क्रमांकासह दोनदा तर काहींचे तीनदा आलेले आहे. अनेक कुटुंब एकञ राहत असतांना कुटूंबातील सदस्यांचे नांव वेगवेगळ्या प्रभागात दर्शविण्यात आले आहेत. प्रारूप मतदार यादीतील असंख्य नांव त्या प्रभागात वर्षानुवर्षे राहत असलेल्या व्यक्तीला माहीत नसल्याचे निदर्शनास आले आहेत. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वेगळ्या मतदार संघात मतदान केलेल्या अनेक विवाहीत महीलांचे नांव आजही मूल शहराच्या यादीत कायम आहेत. हा सर्व प्रकार लक्षात घेतल्यास तंञज्ञानाच्या युगात निवडणुक आयोग आंधळा होवु शकतो. याविषयी गुरनुले यांनी आश्चर्य व्यक्त केले. ह्या सर्व चुका लक्षात घेवुन प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची अधीसुचना जाहीर होण्यापूर्वी मतदार यादीत झालेल्या चुका सुधाराव्यात. अन्यथा पारदर्शक निवडणुक होण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. असा सज्जड दमही तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले यांनी दिला. यावेळी बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, संचालक घनश्याम येनुरकर, महीला तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलीनी आडपवार, युवक तालुकाध्यक्ष पवन निलमवार, जि.प.च्या माजी सदस्या मंगला आञाम आदी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here